मुंबई: हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला काल रोखठोक इशारा दिला. पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक कोठडीत असतील, असंदेखील राऊत म्हणाले. त्यामुळे भाजपचे ते साडे तीन लोक कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना भवनातून बाहेर पडताना राऊतांनी या प्रश्नाला उत्तर दिलं.
तुरुंगात जाणारे भाजपचे ते साडेतीन लोक कोण? अशी विचारणा शिवसेना भवनातून बाहेर पडताना पत्रकारांनी केली. त्यावर ते लोक कोण हे उद्यापासून कळेल आणि ते आत गेल्यावर मोजत बसा असं उत्तर राऊत यांनी दिलं. त्याआधी शिवसेना भवनातील पत्रकार परिषद संपून राऊत खुर्चीवरून उठतानाही त्यांना हा प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते साडे तीन लोक आहेत. त्यातला कोणी अर्धा आहे, कोणी पाव आहे, तर कोणी चार आण्याचा असल्याचं विधान राऊत यांनी केलं.
भाजपला सरकार पाडायचं आहे. पण शिवसेना झुकत नाही म्हणून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. अनिल परब, रविंद्र वायकर, भावना गवळी, आनंदराव अडसूळ या नेत्यांवर खोटे आरोप करण्यात येत आहेत. शिवसेना शरण जात नाही म्हणून यंत्रणांच्या मदतीनं कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण शिवसेना गुडघे टेकणार नाही. मला अडचणीत आणण्यासाठी कुटुंबीयांना, नातेवाईकांना चौकशीसाठी नेलं जात आहे. त्यांना १२-१४ तास ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवण्यात येत आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला गेला. त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्या रात्री मी अमित शाहांना कॉल केला होता. मला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. माझ्याशी दुश्मनी आहे, तर मला अटक करा. माझे नातेवाईक, मित्र, निकटवर्तीय त्यांना का टॉर्चर करता?, असा सवाल मी त्यांना विचारला होता, असं राऊतांनी सांगितलं.