मुंबई - गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निकालाचे पडसाद आता सगळीकडे उमटू लागले आहेत. गुजरातमध्ये मागील २७ वर्षांची सत्ता राखतानाच भाजपाने याठिकाणी रेकॉर्डब्रेक कामगिरीच्या दिशेने वाटचाल केलीय. गुजरातचा निकाल अपेक्षित होता. याठिकाणी विरोधकांनी एकत्र येत निवडणूक लढवायला हवी होती तर भाजपाला काटे की टक्कर देता आलं असतं असं विधान शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, मतविभागणी झाली नसती तर विरोधकांना यश मिळालं असते. देशाच्या राजधानीत आपला मिळालेले यश कौतुकास्पद आहे. १५ वर्षाची सत्ता हिसकावून घेणे हे सोप्पं काम नाही. पण कदाचित दिल्ली तुम्हाला सोडतो आणि गुजरात आम्हाला सांभाळू द्या अशी तडजोड झालीय का अशी शंका आहे असं सांगत अप्रत्यक्षपणे राऊतांनी आप-भाजपात डिल झाल्याचा आरोप केला.
तर हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल. देशाच्या पुढील निवडणुकीत आशादायक चित्र आहे. पण विरोधकांनी मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असं आवाहनही खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
राहुल गांधींचा संबंध नाही गुजरात निकालाचा संदर्भ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेशी लावणं चुकीचे आहे. राहुल गांधी काँग्रेस अंतर्गत राजकारणापासून लांब आहे. देश जोडणे, लोकांची मने जोडणे, संघर्ष थांबवणे यासाठी राहुल गांधींनी यात्रा सुरू आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाशी राहुल गांधींना जोडणे योग्य नाही असं सांगत गुजरात निकालावरून राहुल गांधींना टार्गेट करणे योग्य नाही असं राऊतांनी स्पष्ट केले.