मुंबई: हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो अब बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत काल भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान देणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काही प्रश्नांवरून राऊत संतापले.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊत गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. शिवसेनेची आज होणारी पत्रकार परिषद त्याच पार्श्वभूमीवर होत आहे. त्यातच आज सकाळी सक्तवसुली संचलनालयानं मुंबईतील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या नेत्याबद्दल असल्याची माहिती मिळाली आहे. ईडीची कारवाई देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं होत असेल तर त्या कारवाईच स्वागत करू, असं राऊत म्हणाले.
पत्रकारांशी संवाद सुरू असताना राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर अरे सोड रे असं उत्तर राऊतांनी दिलं. गुजरातमध्ये बँकेचा मोठा घोटाळा झाला. त्याकडेही ईडीनं लक्ष द्यावं. तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. दोन वर्षे हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात एफआयआरदेखील झाला नाही. या घोटाळ्यात कोणाचे लागेबांधे आहेत, या प्रकरणातील सूत्रधार कसे पळाले याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली.