मुंबई: भाजपानं प्रकाशित केलेलं 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक वादात सापडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादीनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. शिवरायांच्या वारसांना महाराजांची मोदींशी केलेली तुलना मान्य आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 'जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली,' असंदेखील राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्या तुलनेवरुन संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपावर शरसंधान साधलं आहे. 'महाराष्ट्र भाजपानं यावर भूमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज,' अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं. 'शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून जयभगवान गोल महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का? सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?,' असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले आहेत.