रत्नागिरी: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून सातत्याने बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला जात आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका करत, एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट तरी करता येतं का, अशी विचारणा केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना, मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठे पाप झाले आहे. शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावे असे आव्हानही विनायक राऊत यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावे लागेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकले आहे असे ट्वीट करत प्रत्युत्तर दिले होते. एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावे लागेल. कुणीतरी लिहून द्यायचे आणि ट्वीट करायचे. स्व:तच्या हाताने ट्वीट करता येते का? याचा अभ्यास करावा लागेल, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा कुटील डाव ४० अलिबाबा चोरांच्या माध्यमातून भाजपा खेळत असेल, तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार होती तर तुम्ही बैठकीत, चर्चेत हा मुद्दा मांडायला हवा होता. आता केलेल्या गद्दारीचं खापर शंभूराजे देसाई संजय राऊत यांच्यावर फोडत आहेत. उद्धव ठाकरे तुम्हाला सतत आवाहन करत असताना तुम्ही परत का आला नाहीत, असा सवाल राऊत यांनी केला आहे.