मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आता एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. राज्यातील अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी वर्गाला निर्देशही दिले आहेत. मात्र, यातच आता शिवसेनेकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची तात्पुरती हौस भागली आहे. मात्र, यामागे भाजप असून, शिवसेना संपवण्याचा डाव यशस्वी होणार नसल्याचा स्पष्ट इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिला आहे.
विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हा भाजपचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे काही कायम स्वरूपी नाही. फक्त एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले इतर ३९ आमदार गेल्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे जरी नुकसान झाले असले, तरी शिवसेनेचा मूळ ढाचा कुठेही ढासळलेला नाही, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
शिवसैनिक तुम्हाला गाडून टाकतील
मी भाजपाला इशारा देतोय, की घोडेबाजारात तुम्ही किती हजार कोटींची उधळपट्टी केली, हे सर्वच लोकांना माहिती झालं आहे. अशा प्रकारे पैशांचा वारेमाप वापर करून शिवसेना संपवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल, तर तुमचा विचार फोल ठरेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तुम्ही विकत घेतले असतील. पण शिवसैनिक विकत घेण्याचा विचार तुम्ही कदापि करू नका. शिवसैनिक तुम्हाला गाडून टाकतील, या शब्दांत विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाटक सुरू झाले होते
ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच जे लोक मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेले होते, त्यांचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाटक सुरू झाले. ५-६ महिन्यांपूर्वीपासून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत होते. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे असेल, तर मी खाली उतरतो असे त्यांना सांगितले होते. एकनाथ शिंदेंशी वारंवार सविस्तर चर्चा झाली होती. पक्षात फूट पाडण्याचे काम करू नका असे त्यांना सांगितलं होते. सूरतला ते गेले, त्याच्याही आधी ३ ते ४ वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता. उद्धव ठाकरेंसोबत अन्नावर हात ठेवून ज्यांनी शपथ घेतली होती, असे काही मंत्री दुसऱ्या तासाला निघून गेले होते, अशी घणाघाती टीका विनायक राऊतांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख हे आजही तेवढ्याच ताकदीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत. महाराष्ट्रात एकट्या शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करत आहेत, असा दावा राऊतांनी यावेळी केला.