नवी दिल्ली : दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे जवळपास सर्व खासदार शिवसंपर्क यात्रेत गुंतलेले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १४ मार्चला सुरू झाला. आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. परंतु, शिवसेनेचे बहुसंख्य खासदार सभागृहातून गैरहजर आहेत. विदर्भ व मराठवाडा या प्रदेशांमध्ये शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व खासदारांवर जबाबदारी टाकली आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यात सेनेचे खासदार सध्या महाराष्ट्रातच फिरत आहेत. सेना खासदार कृपाल तुमाने (रामटेक) यांनी केवळ सोमवारी हजेरी लावून नागपूर गाठले. सेनेच्या राज्यसभेतील सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या चर्चेत भाग घेतला. त्या आज, बुधवारी मुंबईला रवाना झाल्याचे सेनेच्या येथील संपर्क कार्यालयाने ‘लोकमत’ला सांगितले.सेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेच केवळ सध्या दिल्लीत असून इतर जवळपास सर्व जण पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या मिशनमध्ये गुंतलेले आहेत.
अधिवेशन सोडून शिवसेना खासदार वेगळ्याच मिशनवर; उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 9:13 AM