मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून भाजपाशी मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करत महाविकास आघाडीची स्थापना केली होती. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. दरम्यान, आता या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त झालेल्या एका सर्वेमधून आता निवडणुका झाल्यास राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक फायदा कुठल्या पक्षाचा होईल, याबाबतचेही कल समोर आले आहेत.
साम टीव्हीने केलेल्या या कलानुसार महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा हा शिवसेनेला होताना दिसत आहेत. अगदी मविआमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरी सर्वाधिक ७७ जागा ह्या शिवसेनेला मिळताना दिसत आहेत. तसेच शिवसेनेला २४ टक्क्यांपर्यंत मते मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीला ५९ पर्यंत जागा आणि २१.४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला फारसा फायदा होताना दिसत नाही. काँग्रेसला ४० जागा आणि १४.२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
तसेच राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठीही उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे, सुमारे २९.७ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना पसंती दिली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना २२.४ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. तसेच १६ टक्के लोकांनी अजित पवार यांना पसंती दिली आहे.
दरम्यान, या सर्वेनुसार राज्यात आज निवडणूक झाल्यास राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील सत्तेत कायम राहणार आहे. तर भाजपाला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या तिन्ही पक्षांना मिळून १७८ जागा मिळतील. तर भाजपालाही मतदारांचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, भाजपाला १०१ एवढ्या जागा मिळतील. तर इतरांच्या खात्यात ९ जागा जातील.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास शिवसेनेला ७७, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ आणि काँग्रेसला ४० जागा मिळतील. तर सर्व पक्षांची स्वतंत्र निवडणूक लढवल्यानंतरही भाजपाच्या जागा १०४ च्या आसपास राहण्याची शक्यता या सर्वेमधून व्यक्त करण्यात आली आहे.