फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:59 PM2019-11-05T12:59:03+5:302019-11-05T13:04:35+5:30
पवारांनी आणि त्यांच्या टीमने पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांना धुळ चारली. हाच पॅटर्न फुटणाऱ्या आमदारांवर देखील वापरण्यात येईल, असंही राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई - सध्या मुख्यमंत्रीपदावरून अनेक वर्षांचे मित्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेत घमासान सुरू आहे. त्यामुळे उभय पक्षातील नेते युती कायम ठेवून सत्ता स्थापन करणार की, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या शक्यतेवर भाजपकडून कर्नाटकची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी शक्कल लढवली आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांनी मिळवून भाजपला बाजुला ठेवत सत्ता स्थापन केली होती. मात्र हे सरकार पाच वर्षे पूर्ण करण्यात अपयशी ठरले. भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचे अनेक आमदार फोडण्यात यश मिळवले. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेने असा प्रयोग महाराष्ट्रात करण्याचा पर्यत्न केल्यास, राज्यातही कर्नाटकची पुनरावृत्ती होईल, अशी धमकी निकालाच्या दिवशी भाजप प्रवक्त्याकडून देण्यात आली होती.
दरम्यान सत्तास्थापनेच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचवेळी या पक्षांनी संभाव्य फुटीची शक्यता लक्षात घेऊन एक शक्कल लढवली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार फुटल्यास, त्या आमदाराला पाडण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येईल असा दावा त्यांनी केली. मग तो आमदार कोणत्याही पक्षाचा असो, असा दम पाटील यांनी फुटीच्या मार्गावर असलेल्या नेत्यांना भरला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पवारांनी आणि त्यांच्या टीमने पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांना धुळ चारली. हाच पॅटर्न फुटणाऱ्या आमदारांवर देखील वापरण्यात येईल, असंही राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.