- रवींद्र देशमुख
मुंबई - राज्याचे राजकारण एका वेगळ्या वळणार आले आहे. सर्वात मोठा पक्ष ठरला असताना देखील भाजपने सत्ता स्थापनेपासून स्वत:ला वेगळं करून घेतलं आहे. तर विधानसभा निवडणुकीत सोबत लढलेल्या शिवसेनेने देखील भाजपला विरोधकांच्या मदतीने सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. असचं काहीसं चित्र जालना जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांपासून आहे. तोच पॅटर्न आता विधानसभेतही दिसणार आहे. त्यामुळे जालना पॅटर्नची सगळीकडे चर्चा रंगत आहे.
विधानसभा निवडणुकीत युती करून लढलेल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र 50-50 च्या फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत बिनसलं आहे. तर भाजपने देखील विरोधात बसण्याची भूमिका घेतली आहे.
जालना जिल्हा परिषदेत अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब पाटील दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यातील मतभेद तीव्र झाले होते. त्याचवेळी जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. रावसाहेब पाटील दानवे यांना हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र तरी देखील शिवसेना-भाजपने विधानसभा निवडणूक सोबत लढवली होती. त्यामुळे सत्तेचा जालना पॅटर्न राज्यभर गाजला होता.
आता विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार आहेत. त्यामुळे 'जालना पॅटर्न' राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राबविण्यात येणार हे निश्चित आहे. आहे. या पॅटर्नची चर्चा जालना जिल्ह्यासह राज्यभर गाजणार आहे.