अतुल कुलकर्णी -मुंबई : भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यासाठी रोखण्याच्या कारवाईवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय तणातणी सुरू झाली. या सर्व प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे तीन पक्षांचे सरकार असल्याने समन्वयाने आणि चर्चेने प्रश्न सोडविले पाहिजेत. परस्पर निर्णय होत असतील आणि त्याचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होत असेल तर हे अत्यंत धोकादायक आहे, अशी तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर, ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग केले की नाही माहिती नाही,’ असे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी गृहविभागावर घेतली.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा विषय जेव्हा आला, तेव्हा सर्वांनी एकत्रितपणे चर्चा केली होती. शिवसेनेच्या एका नेत्याने स्पष्ट केले की, ज्या गोष्टींचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होऊ शकतो असे विषय मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याशी बोलूनच सोडविले गेले पाहिजेत. सोमय्या प्रकरणात तसे झाले नाही. परिणामी, विरोधकांना निष्कारण सरकारला बोल लावण्याची संधी मिळाली. मात्र राणे यांच्यावरील कारवाईची कसलीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नव्हती, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. महाआघाडीत तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची समन्वय समिती बनविण्यात आली आहे. समितीने एकत्रित बसून एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांत कधीही डावललेला नाही, असे सांगून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, जर या प्रकरणातही अशा पद्धतीने तातडीने चर्चा झाली असती, तर आज सरकारला खुलासे करण्याची वेळ आली नसती. गणपती विसर्जन असल्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील हे कोल्हापुरातच होते. पण, त्यांना याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.
खुलासे करण्याची वेळजिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी निर्णय घेतले. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. आपले अधिकारी चुकले तरी शेवटी विभाग प्रमुख म्हणून ती जबाबदारी आपली आहे, असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांना अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीचे खुलासे करीत बसण्याची वेळ आली आहे.