उस्मानाबाद: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात नवनव्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यातच मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षातील वाद वाढताना दिसत आहे. यातच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करा आणि वाय दर्जाची सुरक्षा घ्या ही योजना केंद्राने सुरू केली आहे, अशा शब्दांत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर टीका केल्यास केंद्र सरकारकडून तात्काळ वाय सुरक्षा मिळते हे अनेक उदाहरणावरून दिसते. टीका करणे हा सुरक्षा मिळवण्याचा मार्ग बनला आहे. राज ठाकरे यांना पुर्वीपासूनच आवश्यक ती सुरक्षा आहे. त्यामुळे ते केंद्राची सुरक्षा घेतील असे मला वाटत नाही, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे याचेच लाभार्थी
पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कंगना रणौत, नवनीत राणा, किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी आहे. ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे ते मुख्यमंत्री यावर बोलतात. विकासाच्या प्रश्नापासून लक्ष उडविणे व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशीदिवरील भोंगे व हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला असून हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून नये, असा सल्ला नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंना दिला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार असल्याची चर्चा असून याबद्दल प्रश्न विचारला असता, पक्षाने आदेश दिल्यास अयोध्येला जाईन, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, धाराशिव व संभाजीनगर नामकरण बाबत केंद्राची दुटप्पी भूमिका आहे. उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक ठराव शिवसेनेने मांडले, मात्र केंद्र सरकारच्या दुजाभाव व दुटप्पी भूमिकेमुळे हे नामकरण होत नसल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.