'या' बाबतीत शिवसेनेची कामगिरी भाजपपेक्षा सरस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 05:41 PM2019-09-10T17:41:27+5:302019-09-10T17:41:50+5:30
लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीनुसार तब्बल २२८ मतदारसंघात युती आघाडीवर आहे. मात्र यात शिवसेना वरचढ ठरली आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने महाराष्ट्रात शानदार कामगिरी केली. युती असल्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यातील मत विभाजन टळले. त्याचा फायदाही या पक्षांनाच झाला. मात्र आकडेवारी पाहिल्यास, भाजपपेक्षा शिवसेनेची कामगिरी सरस दिसत असून याचा लाभ शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले. भाजपने एकट्याने बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यानुसार भाजपने विधानसभा निवडणुकीची वाटचाल सुरू केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीनुसार तब्बल २२८ मतदारसंघात युती आघाडीवर आहे. मात्र यात शिवसेना वरचढ ठरली आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपने सर्वाधिक १२२ जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. या आकडेवारीवरून लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघानुसार भाजपला १२२ व्यतिरिक्त केवळ ६ मतदार संघात आघाडी घेता आली. तर शिवसेनेने या बाबतीत चमकदार कामगिरी केली आहे. शिवसेनेने २०१४ मध्ये जिंकलेल्या ६३ जागा वगळता, लोकसभा निवडणुकीत तब्बल ३७ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी २०१४ पेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. याच आकडेवारीनुसार काँग्रेस २१ तर राष्ट्रवादी १८ विधानसभा मतदार संघात पिछाडीवर आहे.