Maharashtra Politics: महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. काही मुद्द्यांवरून हा संघर्ष तीव्र झालेला पाहायला मिळाला. यातच तामिळनाडूमध्येही राज्यपाल विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष झाला. यावरून शिवसेनेने महाराष्ट्रातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका करत तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. मुख्यमंत्री अनेकदा राज्यपालांबरोबरचा संघर्ष टाळतात. केंद्राशी पंगा कशाला? असे त्यांचे धोरण असते, पण तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांशी संघर्ष केला व तामीळ अस्मितेसाठी केंद्राशी पंगाही घेतला. महाराष्ट्रातील शेपूटबहाद्दरांनी हे लक्षात घेतले पाहिजे, या शब्दांत शिवसेनेने निशाणा साधला.
शिवरायांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे राज्यपाल राजभवनात सुखात आहेत व तिकडे स्टॅलिन यांनी त्यांच्या राज्यपालांना पळवून लावले व ‘गेट आऊट रवी’ची जोरदार मोहीम सुरू केली. राज्यपाल हे घटनेचे रखवालदार म्हणून काम करतात. केंद्र व राज्यातील दुवा म्हणून ते कर्तव्य बजावतात. एक प्रकारे ते पांढरे हत्तीच असतात. या पांढऱ्या हत्तींनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावे हीच अपेक्षा आहे, पण हे पांढरे हत्ती सध्या उधळू लागले आहेत. श्रीमान स्टॅलिन यांनी उधळलेल्या पांढऱ्या हत्तीस पळवून लावले. शाब्बास स्टॅलिन!, असे कौतुक शिवसेनेने मुखपत्र सामना अग्रलेखातून केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणसांना एक मंत्र
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांना एक मंत्र नेहमी देत, तो म्हणजे, दाक्षिणात्यांची जात्यंधता आणि मुसलमानांची धर्मांधता तुमच्या अंगात भिनल्याशिवाय महाराष्ट्राचा उत्कर्ष होणार नाही. तामीळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेत केलेल्या अभिभाषणावरून त्यांच्या समोरच गदारोळ उडाला व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीच वेलमध्ये जाऊन राज्यपाल रवींचे भाषण रोखले. राज्यपाल रवी हे भाजप व संघाचा अजेंडा राबवित आहेत व सरकारवर लादत आहेत, अशी टीका आता सुरू झाली आहे. राज्यपालांनी तामीळ अस्मितेचा अपमान केल्याने तामीळनाडूत सर्वत्र ‘गेट आऊट रवी’ अशी पोस्टर्स झळकली आहेत. राज्यपालांना परत बोलवावे अशी जोरदार मोहीम सुरू झाल्याने तामीळनाडूतही ‘राज्यपाल विरुद्ध सरकार’ असा संघर्ष पेटला आहे. जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याचेच दुसरे रूप तामीळनाडूत दिसत आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
राज्यपालांची आता थंडगार कुल्फीच झाली
महाराष्ट्रात राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करूनही सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे चिडीचूप आहेत. महाराष्ट्रात ‘ठाकरे सरकार’ असताना विद्यमान राज्यपाल उकळत्या तेलातील पापडाप्रमाणे तडतडत होते. राज्यात सत्ताबदल होताच ते तडतडणारे राज्यपाल कोठेच दिसत नाहीत. राज्यपालांची आता थंडगार कुल्फीच झाली आहे. अशा राज्यपालांनी महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
दरम्यान, तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तेथील राज्यपालांना तडकावून जो स्वाभिमानी बाणा दाखवला तो कौतुकास्पद आहे. तामीळनाडूचे राज्यपाल रवी हे सुटाबुटातले भगतसिंह कोश्यारी आहेत, असे टीकास्त्र शिवसेनेने साडले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"