Maharashtra Politics: चीनचे लाडके पात्र आणि नेपाळचे कम्युनिस्ट नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांची तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यापासून जी भीती व्यक्त केली जात होती ती खरी ठरताना दिसत आहे. चीनच्या कडेवर बसून नेपाळचा गाडा हाकणारे प्रचंड महाशय पूर्वांपार हिंदुस्थानविरोधीच आहेत आणि पंतप्रधान झाल्यावर चीनच्या सांगण्यावरून त्यांच्या हिंदुस्थानविरोधी कुरापती सुरू होतील, असे मत आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार मांडत होतेच. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला सल्ला दिला आहे.
नेपाळसारख्या टीचभर देशाने हिंदुस्थानच्या काही भूभागांवर हक्क सांगावा हे नक्कीच चांगले लक्षण नाही. एकेक करून आशियाई देश हिंदुस्थानविरोधी यादीत जाऊन बसत असतील तर हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांनीही आपले परराष्ट्र धोरण एकदा तपासून पाहिले पाहिजे. चीनच्या ओंजळीने पाणी पिऊन नेपाळ आज वाकडे पाऊल टाकत असला तरी तो आपला पारंपरिक मित्र आहे. चीनच्या डावपेचांना काटशह देऊन हा मित्र जपायलाच हवा. भौगोलिक व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही ते आवश्यकच आहे, असे शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटले आहे.
नेपाळने हिंदुस्थानविरोधात असे शड्डू ठोकावेत ही सामान्य गोष्ट नक्कीच नाही
हिंदुस्थानच्या हद्दीत असलेल्या काही भागांवर नेपाळ सरकारने दावा ठोकला असून, चीनप्रमाणेच हिंदुस्थानसोबत सीमेवरून तंटा-बखेडा उभा करण्याचे धोरण नेपाळनेही स्वीकारल्याचे दिसते. हिंदुस्थानच्या भूभागावर नेपाळने केवळ दावाच केला असे नाही; तर उत्तराखंड राज्यातील नेपाळ सीमेलगतचे कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा ही तीन क्षेत्रे हिंदुस्थानकडून परत घेऊ, अशी एकतर्फी घोषणा करून नेपाळ सरकार मोकळे झाले आहे. पुष्प कमल प्रचंड यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर जेमतेम पंधरवडाही होत नाही, तोच नेपाळने हिंदुस्थानविरोधात असे शड्डू ठोकावेत ही वाटते तितकी सामान्य गोष्ट नक्कीच नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
नेपाळचा जीव तो किती?
प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उत्तराखंडमधील लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख हा प्रदेश हिंदुस्थानच्या ताब्यातून परत घेण्याचे आश्वासन नेपाळच्या जनतेला दिले आहे. नेपाळ सरकारने केल्यामुळे सीमेच्या वादावरून हिंदुस्थानशी संघर्ष करण्याची मानसिकता नेपाळने बनवली आहे असे दिसते. नेपाळचा जीव तो किती? आर्थिक क्षमतेपासून लष्करी सामर्थ्यापर्यंत कुठल्याच बाबतीत हिंदुस्थानच्या पासंगालाही न पुरणारा नेपाळ अशी आगळिक का करत असावा? चीनचे कावेबाज डावपेच हेच याचे उत्तर आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
दरम्यान, नेपाळात सत्तेवर आलेली लाल माकडे चिनी झाडांवर उड्या मारण्यासाठी कितीही आतुर असली तरी नेपाळच्या सर्वसामान्य जनतेला मनात मात्र चीनच्या तुलनेत हिंदुस्थानच आपला आणि जवळचा वाटतो, ही आपल्यासाठी मोठीच जमेची बाजू आहे, असे नमूद करत, चीनच्या ओंजळीने पाणी पिऊन नेपाळ आज वाकडे पाऊल टाकत असला तरी तो आपला पारंपरिक मित्र आहे. चीनच्या डावपेचांना काटशह देऊन हा मित्र जपायलाच हवा, असा सल्ला शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"