शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
कैलास पाटील कसे निसटले? गुजरात चेकपोस्ट, पाऊस, मोटरसायकल, ट्रक; सांगितला रात्रीचा थरार
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्य़ास तयार आहे. परंतू आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असेही राऊत म्हणाले.
वर्षावर आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून कसे पलायन केले याचा घटनाक्रम सांगितला. तसेच शिवसेनेविरोधात कटकारस्थान आखले जात असल्याचा आरोप केला आहे.
कैलास पाटील कसे निसटले? आम्हाला ठाण्यात महापौरांच्या बंगल्यावर नेण्यात आले. तिथून आम्हाला साहेब पुढे आहेत, तिकडे आपल्याला जायचे आहे, असे सांगितले. स्टाफ आमच्यासोबत होता. आम्हाला दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले. पुढे निघालो, वसई-विरार मला ते भाग माहिती नाहीत, शहरे संपू लागली आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली, अशा शब्दांत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी गुजरातला नेण्याच्या घटनेचा थरार सांगितला.