काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सातत्यानं ५० खोक्यांवरून होत असलेल्या आरोपांवर रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले तरी त्यांना डायबिटीस होत नाही," असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
“आदित्य ठाकरेंचं वय आहे ३१ वर्षे. माझं राजकारणातलं वय ५२ वर्ष आहे. त्यांचा राजकारणातील अभ्यास किती आहे हे महाराष्ट्राला कळलं आहे. आपलं वय काय, आपण काय बोलतो, आपण ठाकरे कुटुंबातील आहोत याचं भान त्यांनी ठेवायला हवं. गुवाहाटीला गेलेले आमदार त्यांच्या मतदार संघात कसे पाय ठेवतो हे बघतो, असं ते म्हणाले होते. सर्व आमदार आले, मतदार संघात गेले, त्यांचं प्रचंड स्वागत झालं. काही करू शकलात का तुम्ही?, तुमच्या सोबत आता कोणी नाही,” असं रामदास कदम म्हणाले.
“माझ्या वरळी मतदारसंघातून कसे जातात पाहतो असं ते म्हणाले, सर्व आमदार तिकडून गेले, काय केलत तुम्ही? तुम्ही आव्हान दिलं होतं, ठाकरे आडनाव आहे ना? त्यानंतर विधानभवनाची पायरी कशी चढतात हे पाहतो म्हणाले, काय केलं तुम्ही? तुमच्याकडे काही नाही, कालपर्यंत आमच्या जीवावर आव्हान देणं चाललं होतं,” असंही ते म्हणाले. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. “शंभर शंभर खोक्यांचं तुम्ही काय केलंत, याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल ना. दुसऱ्यांना काय बोट दाखवताय ५० खोके, तुम्ही घेतलेल्या १०० खोक्याचं बोला काय ते. मातोश्रीवर किती मिठाईचे खोके गेले, तरी त्यांना डायबिटीस होत नाही. हे मी पाहिलंय, इतक्या वर्षांचा अनुभव आहे,” असंही रामदास कदम म्हणाले.उद्
"उद्धव ठाकरेच बेईमान..."मुख्यमंत्री व्हायचं म्हणून शिवसेना प्रमुखांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, पक्षाशी बेईमानी केली. गद्दार ते आहेत, एकनाथ शिंदे नाहीत. उद्धव ठाकरे हे मराठा द्वेष्टे आहेत. मराठा माणूस मोठा झालेला त्यांना आवडत नाही. फक्त वापरून घ्यायचं हे मी जवळून पाहिलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.