महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. आम्हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला विधानसभेतील ५० आमदारांनी आणि लोकसभेतील १२ शिवसेना खासदारांनी समर्थन दिले आहे. दोन तृतीयांश बहुमत शिंदे यांच्याकडे असल्याने गटनेता, प्रतोद बदलून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला. दरम्यान, यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. आता आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“आदित्य ठाकरे यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे. ते सूज्ञ आहेत. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर भाष्य करण योग्य नाही. सरकार अनधिकृत आहे अधिकृत आहे हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल,” असे सुहास कांदे म्हणाले. “गद्दारी करायला आम्ही शिवसेना पक्ष सोडला नाही. आम्ही नियमांनुसार अध्यक्षांनी जो गटनेता, प्रतोद नेमला होता त्या व्हिपनुसार आम्ही शिवसेनेला मतदान केलं. आम्ही बाळासाहेबांच्याच शिवसेनेला मतदान केलं. आमच्यात भगवंच रक्त आहे,” असं कांदे म्हणाले. टीव्ही ९ शी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आदित्य ठाकरेंच्या हातातला भगवा काल कुठे होता? शिवसेनेचं, हिंदुत्वाचं प्रतीक काल हातात दिसलं नाही. तुम्ही भगवा सोडलाय का?, असा सवालही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.
“मी आजही ठाकरे कुटुंबीयांच्या जवळ आहे. बाळासाहेबांचे वंशज म्हणून ते आजही आमच्या देवाच्या स्थानी आहेत. प्रश्न हिंदुत्वाचा आहे. आपला पक्ष कुठे चालला आहे? आपल्याला बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. आपण कुठे चाललो आहोत हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे,” असंही त्यांनी सांगितलं.