शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार भाषणे केली. यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य बंडखोर आमदार आपापल्या गावी, मतदारसंघात परतले आहेत.
वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे आपल्या मतदारसंघात परतले. यावेळी बोरणारे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. माध्यमांशी बोलताना रमेश बोरणारे यांनी गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवर स्पष्टपणे भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. बंडखोरी का घडली याबाबत एकनाथ शिंदे यांनी सर्व सांगितले आहे. त्यामुळे मी आता अधिक बोलणार नाही, असे बोरणारे म्हणाले.
गेली ३० वर्ष शिवसेनेसाठी काम करतोय
गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. पण मी एवढेच सांगू इच्छितो की, एकाच वेळी ५० आमदार पक्षातून निघून जातात, ही गोष्ट समजण्यासारखी आहे. यासाठी उद्धव ठाकरेंना दोष देणार नाही, परंतु उद्धव साहेबांच्या आजूबाजूला जे चार बडवे आहेत, त्यांना दोष देणार आहे. त्यांनीच आमच्यासारख्यांना बाजूला काढण्याचं काम केले आहे, असा आरोप बोरणारे यांनी केला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की, बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. आम्ही त्या घराण्याला कधीही विसरू शकत नाहीत. आम्ही बंडखोरी केली नाही, आम्ही उठाव केला आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याचा कानमंत्र आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिला आहे. तालुक्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. वैजापूर तालुक्यात जे पाच प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्याचे काम करणार आहे. माझ्याकडून जर काही चुकीच झाले असेल तर २०२४ ला जनता मला माफ करणार नाही. पण जर मी विकासाच्या बाजूने गेलो असेल, तर जनता मला नक्की पुन्हा संधी देईल, असा विश्वास रमेश बोरणारे यांनी व्यक्त केला.