Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचा आनंद असताना, दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना थेट आव्हान दिले आहे. केवळ पक्षाच्या भरवशावर आमदार निवडून आणून दाखवा. जे निवडून येतात त्यांची स्वतःची लायकी, कर्तृत्व असते. पक्षाची मते केवळ १०-२० टक्केच असतात, असा घणाघात केला आहे.
शिवसेनेने संधी दिली म्हणूनच तुम्ही आमदार झालात, अशी टीका करण्यात आली होती. या टीकेला शिंदे गटासोबत गेलेले बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने दिलेल्या संधीवर आणि धनुष्यबाणावर निवडून आले असते तर महाराष्ट्रात शिवसेनेचे २८८ आमदार राहिले असते, असे सणसणीत टोलाही संजय गायकडवाड यांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अनेक जण ३०-३५ वर्षांपासून राजकारण- समाजकारणात आहेत
अनेक जण ३०-३५ वर्षांपासून राजकारण-समाजकारणात आहेत. पाच ते सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. एक-एक लाख त्यांचे मताधिक्य आहे. त्यापैकी एकही जण आगामी काळात पडणार नाही. अजूनही आम्ही आमच्या मर्यादा सोडलेल्या नाहीत. त्यांचा मुलगा आमच्याविषयी वाटेल ते बोलतो. आम्ही अजूनही तोंड उघडले नाही. आम्हाला त्यांची गुपिते माहीत आहेत, ते जाहीर केली तर सगळे उघडे पडतील, असा थेट इशाराच संजय गायकवाड यांनी दिला.
शिंदेंसारखा मुख्यमंत्री या देशात पाहायला मिळणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जमिनीवरील नेते आहेत. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री या देशात पाहायला मिळणार नाही. जर भाजप आणि आमची युती आहे तर दिल्लीत चर्चेसाठी जाण्यात गैर काय? चर्चा करूनच सरकार चालवावे लागते. तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींकडे जात नव्हता का? मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून टीका करतात, मागच्या सरकारमध्येसुद्धा ६२ दिवस लागली होती. ६२ दिवस आम्ही आमदार हॉटेलमध्ये बंद होतो, विसरलेत का तुम्ही? असा उलटप्रश्न संजय गायकवाड यांनी केला आहे.