मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यानंतर बंडखोर आमदारांमधील शहाजी बापू पाटील यांनी आपल्या गावरान हटके शब्दांत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
माझ्या राजकीय अनुभवातून लोकशाहीच्या इतिहासात जी राज्य चाललेली आहेत, त्या देशांमध्ये असे कोणतेही उदाहरण घडलेले नाही. हे एक ऐतिहासिक उदाहरण आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे राज्याला साताऱ्याच्या दऱ्या-खोऱ्यातून आलेले आणि आनंद दिघे यांच्या छायेखाली वाढलेले कणखर नेतृत्व मिळाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून त्यांनी राजकारण केले. महाराष्ट्राला मिळालेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलेला मुख्यमंत्री, ओक्के माझा महाराष्ट्र, अशी हटके प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील
राज्यात जे काही सुरू आहे. आम्हाला सातत्याने बंडखोर म्हटले जात आहे. पांडूरंगाची शपथ घेऊन सांगतो की, ही आमची वैचारिक लढाई आहे. या वैचारिक लढाईत संजय राऊत यांच्यासारख्या राजकारण्यांनी आम्हाला विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी मरणारी माणसे आहोत. शिवसेना संपवण्याचे पाप आमच्याहातून घडणार नाही आणि आम्ही ते करणार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केले. तो कणखरपणा दाखवला आणि ते महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील, असा मला १०० टक्के विश्वास आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले.
दरम्यान, गेल्या आठवडाभरातील सत्ता संघर्षात कुणीही आमदार तणावाखाली नव्हता. मी लबाड बोलणार नाही. उलट नितीन देशमुख यांच्या पत्नीशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून विशेष विमानाने त्यांना परत पाठवले. ते आमच्या विचारांसोबत नाही, हे तेव्हाच कळले, असे शहाजी बापू यांनी सांगितले.