मुंबई - बेंबीच्या देठापासून राम मंदिरासाठी आक्रमक होणाऱ्या शिवसेनेच्या अजेंड्यावरून लोकसभा निवडणुकीत अचानक ‘राम’ गायब झाला होते. युती होताच ह्या मुद्यावर शिवसेनेने नमती भूमिका घेतली होती. आता लोकसभा निवडणुक संपताच आणि विधानसभापूर्वी शिवसेनेला पुन्हा 'राम मंदिराची' आठवण होऊ लागली आहे. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून आज 'रामाचे काय होईल' असा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
देशाच्या सत्तेवर रामाच्या विचाराचे सरकार आले आहे. देशात रामराज्य निर्माण व्हावे यासाठी कोटय़वधी जनतेने मोदींच्या हातात पुन्हा सत्ता दिली आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे व त्यासाठी प्रयत्न करावेत हा काही अपराध नाही. अयोध्येत राममंदिर निर्माण व्हावे यासाठी शेकडो करसेवकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे हौतात्म्य आणि रक्त वाया जाऊ देणार नाही अशा विचाराचे सरकार लोकांनी निवडून दिल्यावर रामाचे काम होणारच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा हेच म्हणाले आहे. असे सामनामधील अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.
मोदी यांनी रामराज्यासाठी विश्वास दाखवला आहे व हेच रामाचे काम आहे. राम मंदिर होणारच आणि मंदिर बनवण्यासाठी कोण विरोध करणार आहे ?. ज्यांनी विरोध केला त्यांना जनतेने घरी बसवले आहे. त्यामुळे रामाचा विजयरथ आता कोणी रोखू शकणार नाही. असे ही सामनामधून सांगण्यात आले आहे.
अग्रलेखात पुढे, सर्वोच्च न्यायालयानेदेखील पुरावे चिवडीत न बसता लोकभावना किंवा जनादेश मानायला हवा, असे म्हटले आहे. कायद्याच्या प्रकियेत राम मंदिरचा प्रश्न अडकवून बसू नयेत, अशी अशा सुद्धा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.