शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. दरम्यान, मुख्यमत्र्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या ‘नट’ मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे, असे म्हणत शिवसेनेने टीकेचा बाण सोडला आहे.
या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल, असा इशाराही शिवसेनेने सामनाच्या संपादकीय मधून दिला आहे.
काय म्हटलेय अग्रलेखात?अब्दुल सत्तार हा काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात दखल घ्यावी असा माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे सोयीनुसार उड्या मारतो. सोयीनुसार डराव डरावही करतो. त्याच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेस ते शोभणारे नाही. या अब्दुल सत्तार यांच्या एका गलिच्छ, बेशरम वक्तव्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व शरद पवार यांच्या सुविद्य कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना या अब्दुल्लाने आपल्या तोंडाचे गटार असे उघडले की, त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडली, असे संपादकीयमध्ये म्हटले आहे.
'हे कोणत्या हैवानांचे राज्य?'अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्याने महाराष्ट्रात असंतोषाची ठिणगी पडली असताना त्याच अब्दुल्लांच्या गळय़ात गळा घालून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सिल्लोड येथे मिरवत होते. ‘‘सत्तार यांनी काय घाण शब्द वापरून महिलांचा अपमान केला, हे आपणास माहीत नाही.’’ अशा काखा वर करून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सिल्लोडला त्याच सत्तारांचा पाहुणचार घेत रमले. महाराष्ट्रावर कोणत्या हैवानांचे राज्य आले आहे ते यावरून दिसते. सत्तार यांना एक क्षणही मंत्रिमंडळात ठेवू नये असा हा सर्व प्रकार आहे.
'… तो शब्द कोणत्या अर्थाने वापरला?'महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काय लायकीचे लोक भरले आहेत ते यामुळे दिसले. जळगावचे खोकेबाज ‘टाईट’ मंत्री गुलाबराव पाटील यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या जाताना दिसत आहेत. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख या खोकेबाज गुलाबरावाने ‘नटी’ म्हणून केला. ‘नटी’ हा शब्द त्यांनी कोणत्या अर्थाने वापरला? असा सवालही करण्यात आला आहे.