शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. दरम्यान, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं.
ते बाळासाहेबांवर हक्क सांगत आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. “ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा, हे माझं त्यांना आव्हान आहे. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे. गेल्याच आठवडय़ात गुरुपौर्णिमा झाली. मी माझ्या वडिलांना आणि आजोबांना गुरू मानतो. प्रत्येकाने मातृदेवभव, पितृदेवभव असं देव मानले पाहिजेत. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. आज माझ्या दुर्दैवाने माझे आई-वडील माझ्यासोबत असे नाहीयेत, पण ते माझ्यात आहेत असे मी मानतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली.
“माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात आणि माझा तर विश्वासघात केलाच. लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं,” असंही ते म्हणाले.