"काँग्रेसमध्ये मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नाही, सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर विश्वास टाकण्याची गरज नव्हती"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 07:31 AM2021-10-01T07:31:18+5:302021-10-01T07:31:47+5:30

शिवसेनेचा सल्ला. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?, शिवसेनेचा सवाल.

shiv sena saamna editorial on punjab congress navjyot singh siddhu amrinder singh political scenario | "काँग्रेसमध्ये मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नाही, सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर विश्वास टाकण्याची गरज नव्हती"

"काँग्रेसमध्ये मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नाही, सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर विश्वास टाकण्याची गरज नव्हती"

googlenewsNext
ठळक मुद्देसिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?, शिवसेनेचा सवाल.

"पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवडय़ांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱया बोलघेवड्य़ांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती," असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. 

"प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?," असा सवाल शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर भाष्य केले.

काय म्हटलंय अग्रलेखात?   
 गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नाही. नरेंद्र मोदींच्या वादळापुढे, भाजपच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत ‘पतली’ झाली व काँग्रेसच्या वाडय़ातील उरलेसुरले वतनदारही सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा याक्षणी मुळापासून हादरला आहे. तिकडे 79 वयाचे कॅ. अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. कॅ. अमरिंदर हे भाजपात जातील, असे सांगितले जात होते, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्डय़ात टाकतील, असे दिसत आहे.

कॅ. अमरिंदर यांना केंद्रीय कृषी मंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ज्यांचे वय 75 झाले. त्यांना सत्तेचे पद मिळणार नाही, असे मोदींचे धोरण आहे. कॅ. अमरिंदर यांचे वय 79 आहे. तेव्हा कसे काय होणार? पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. 

काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच नेत्यांकडे
पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्येही नेतृत्वबदल होईल व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही जावे लागेल अशी हवा निर्माण झाली होती. ती पंजाबमुळे थंड पडली. जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरांवर मालकी हक्क सांगून त्या वाडय़ातच ते पथारी पसरून बसले आहेत. राहुल गांधी वाडय़ाची डागडुजी करू इच्छितात. वाडय़ास रंगरंगोटी करू पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात. पण जुने लोक राहुल गांधींना ते करू देत नाहीत. राहुल गांधींना रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. 

काँग्रेसची सूज जास्तच उतरली
कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवानीसारखे तरुण काँग्रेस पक्षात आले. गुजरातचा हार्दिक पटेलही आलाय. पण त्यामुळे काँग्रेस उसळी मारू शकेल काय? पंजाबात गोंधळ सुरू असताना गोव्यातील काँग्रेसचे जुनेजाणते लोक पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्यात माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो आहेत. कॅ. अमरिंदर, लुईझिन फालेरो यांना मुख्यमंत्रीपदासारखे सर्वोच्च पद पक्षाने देऊनही हे लोक काँग्रेस सोडायला धजावतात हा निगरगट्टपणाचा कळस झाला. जितीन प्रसाद यांना काँग्रेसने केंद्रात मंत्रीपद दिले होते. हे प्रसाद भाजपात गेले व त्यांना उत्तर प्रदेशात मंत्री केले. भाजपकडे मंत्रीपदे वाटण्याची क्षमता आहे म्हणून आज लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणे असे म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे काय होणार, असा घोर लागला आहे.

काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी उपचारही सुरू आहेत, पण ते चुकीचे आहेत का, याचा विचार व्हायला हवा. काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपासही जिंकता येत नाही आणि भाजपासही काँग्रेसचे टॉनिक लागते. पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?

Web Title: shiv sena saamna editorial on punjab congress navjyot singh siddhu amrinder singh political scenario

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.