'प्रश्न सचिन वाझेचा नसून नैतिकतेचा आहे. आज भारतीय जनता पक्षात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक माफीचे साक्षीदार बनून घुसले आहेत व शांत झोपले आहेत. बँका बुडवणारे, काळा पैसा पांढरा करणारे अनेक पांढरपेशे गुन्हेगार माफीचे साक्षीदार बनून भाजपवासी झाले,' असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.
'महाराष्ट्रात तर मंगळसूत्र चोरांच्या टोळीपासून अनेक ‘वाल्या’ शुद्ध-शुचिर्भूत होण्यासाठी माफीचे साक्षीदार बनले व भाजपने त्यांना पवित्र करून घेतले. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आणि अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱया आरोपीसदेखील आज माफीचा साक्षीदार करून उद्या त्याला भाजपवासी केले तर आश्चर्य वाटायला नको. माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजपने स्वतंत्र कक्षच उघडला आहे काय?,' असा सवालही शिवसेनेने केलाय. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हटलंय अग्रलेखात?'वाझेला सीबीआयने राजकीय फायद्या-तोटय़ासाठी माफीचा साक्षीदार करावे हे नीतिमत्तेस धरून नाही. अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ गाडीत स्फोटके ठेवून वाझे याने आधी सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचे सूत्रधार वाझे व परमबीर सिंह आहेत. परमबीर सिंह यांना केंद्राने व कोर्टाने या प्रकरणात सरळ सरळ अभय दिले व आता परमबीर सिंह यांचा हस्तक वाझे यालाही माफीचा साक्षीदार केले जात आहे,' असे शिवसेनेने म्हटले आहे.
‘कोणताही पुरावा नाही’'परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप लावला, पण आरोपाला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. तरीही ईडी व सीबीआयने देशमुख यांच्या घरावर दोनशे वेळा धाडी घातल्या. देशमुख आता तुरुंगात आहेत. परमबीर सिंग करूनसवरून मोकळे आहेत व वाझे यालाही अभय मिळत आहे. यालाच कायद्याचे राज्य म्हणायचे काय? सीबीआयसारखी केंद्रीय संस्था सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवत आहे हा प्रकार साधासरळ नाही,' असे शिवसेनेने नमूद केलेय.
‘हे कायद्याला अपेक्षित नाही’'वाझेला माफीचा साक्षीदार करणे म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे व कायद्याला हे अपेक्षित नाही. या सगळय़ा प्रकरणात मेख वेगळीच आहे. मला साफीचा साक्षीदार करा, असा विनंती अर्ज वाझेने केला व हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयाने वाझेला दिलासा देताना अट काय घातली? माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी देतो, पण सीबीआयला खरे खरे सांगा. खरे सांगायचे म्हणजे काय? जो खटला खोटेपणावर उभा आहे, त्यातला सगळय़ात खोटारडा गुन्हेगार आता माफीचा साक्षीदार बनून खरे काय सांगणार? त्यामुळे वाझे हा सीबीआयचा माफीचा साक्षीदार आहे की भारतीय जनता पक्षाचा, हा प्रश्न अनेकांना पडला असेल.' असेही शिवसेनेने म्हटलेय.