भास्कर समुहाच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. यानंतर याविरोधात देशभरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची दै. 'भास्कर'ची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही. त्यांनी कोणत्याही सरकारवर अवाजवी टीका केली नाही व गुडघे टेकले नाहीत. बहुधा ‘भास्कर’ किंवा ‘भारत समाचार’चे हे कृत्य कोणाला राजद्रोही वाटले असेल व त्यामुळे त्यांच्या कार्यालयांवर देशभरात छापे मारून वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजविण्याचा प्रयोग सुरू केला गेला आहे. असे झाले असेल तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत, असं म्हणत शिवसेसेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे.
कोरोना मृत्यूच्या आकडय़ात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ते हिंदुस्थानी स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत देशातल्या 7 प्रमुख क्षेत्रांत 3.64 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा लेखाजोखा ठळकपणे मांडणाऱ्या ‘भास्कर’ला सरकारी दमनचक्राखाली दडपून मारता येईल असे कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्रावर टीका केली आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात ? दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाचे जोरदार छापे पडले आहेत. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरण गाजत आहे. देशातील 30 पत्रकारांवर पेगॅससच्या माध्यमांतून पाळत ठेवण्यात आली. त्यावरही गदारोळ सुरू झाला आहे. आता वृत्तपत्रांवर छापेही पडले. याआधी असे छापे ‘एनडी टीव्ही’ या वृत्तवाहिनीवर टाकून सरकारने दहशत निर्माण केली होती. ‘भास्कर’ या वृत्तसमूहाचा व्याप मोठा आहे. देशभरात त्यांच्या आवृत्त्या निघतात व त्या लाखोंनी संपतात. हिंदी भाषिक पट्टय़ांत ‘भास्कर’चे जनमानसावर वजन आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विकले जाणारे वर्तमानपत्र असा दै. ‘भास्कर’चा लौकिक आहे. दै. ‘भास्कर’मधील वार्तांकन हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, पारदर्शक व तप्त असते. ते संयमी तितकेच सत्यवादी असते. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची त्यांची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही.
त्यांनी कोणत्याही सरकारवर अवाजवी टीका केली नाही व गुडघे टेकले नाहीत. बहुधा ‘भास्कर’ किंवा ‘भारत समाचार’चे हे कृत्य कोणाला राजद्रोही वाटले असेल व त्यामुळे त्यांच्या कार्यालयांवर देशभरात छापे मारून वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजविण्याचा प्रयोग सुरू केला गेला आहे. असे झाले असेल तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत. आणीबाणी इंदिरा गांधींनी आणली हे खरे, पण त्या व्यवस्थेचा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पडद्यामागे सूत्रे हलविणारे दुसरेच कोणीतरी चांडाळचौकडीचे लोक होते. त्यांच्यामुळे इंदिरा गांधी पुरत्या बदनाम झाल्या. आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे?
दैनिक ‘भास्कर’चे सर्वेसर्वा श्रीमान अग्रवाल यांनीही छापेमारीची पर्वा न करता यापुढेही सत्यासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अग्रवाल यांनी परखडपणे सांगितले, ‘आमचा गुन्हा काय? आम्ही फक्त सत्य सांगितले. आम्ही आमचे काम केले. गंगेत वाहत येणाऱ्या प्रेतांपासून कोरोनामुळे झालेल्या मयतांचे खरे आकडे देशासमोर मांडले. आम्ही फक्त इतकेच केले.’ हे सत्य सांगितल्यामुळेच ‘भास्कर’चा तळपता सूर्य झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे काय? ‘भास्कर’शी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरी छापे मारून त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त केले. ‘भास्कर’ समूहाने करचोरी केली असा आरोप ठेवला आहे, तो खरा आहे असे एकवेळ मान्य केले तरी वृत्तपत्रांवर असे सरकारी हल्ले करून एकप्रकारे दहशत माजविण्याचाच प्रकार आहे. चौकशी व तपास ‘dignified’ पद्धतीने होऊ शकतो, पण अशा प्रकरणात राजकारण घुसले की हे प्रकार घडतात. राजकीय विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमांतून छळले जात आहेच, आता सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’ उपटली जात आहेत.