“कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल,” असे म्हणत शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला.
पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे! त्यामुळे जय नक्की आहे, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजप आणि शिंदे गटावर टीकेचा बाण सोडला.
काय म्हटलेय अग्रलेखात?आज विजयादशमी! अतिशय मोठा आनंदाचा आणि मांगल्याचा सण. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. मात्र या पवित्र मुहूर्ताची निवड काही नतद्रष्टांनी केली आहे ती महाराष्ट्र, मराठी एकजुटीत फूट पाडण्यासाठी. हिंदुत्वाची वज्रमूठ असलेली शिवसेना कमजोर करण्यासाठी काही लोकांनी आजचा मुहूर्त निवडला असला तरी शिवसेना ही काही लेचापेचांची संघटना नाही. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची शिवशक्तीच आहे. ही शिवशक्ती गेली छप्पन्न वर्षे शिवतीर्थावर सीमोल्लंघनासाठी उसळत असते, असे शिवसेनेने म्हटलेय.
महाराष्ट्रात आज सगळे काही विस्कटलेले आहे. एक राज्य गेले व दुसरे आले म्हणजे सर्व काही व्यवस्थित झाले असे म्हणता येत नाही. बहुमतातले सरकार पैसा आणि धमक्या देऊन पाडणे हे पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यासारखेच सोपे आहे असे काही लोकांना वाटत आहे, पण महाराष्ट्रातले नवे सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झाले आहे, असा आरोपही यातून करण्यात आलाय.
देशात इतर नवी राज्ये निर्माण होतील तेव्हा विदर्भाचा लचका तोडू असेच मनसुबे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आहेत व त्यावर सत्तेतला ‘मिंधे’ गट गप्प बसला आहे. महाराष्ट्राची अखंडता, मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातून मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे माहीत असल्यानेच एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना वेगाने घडत असल्याचेही यात नमूद करण्यात आलेय.