‘एकीकडे अग्निवीर अग्निवीर म्हणून बेरोजगार तरुणांना राष्ट्रसेवक वगैरे म्हणायचे आणि दुसरीकडे ते भरतीसाठी आले की, त्यांचा अपमान करायचा. उपाशी-तापाशी लोकांना ‘वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचे. हे धंदे बंद करा,’ असे म्हणत शिवसेनेने सरकारवर निशाणा साधलाय.
‘बेकायदेशीर, घटनाद्रोही कृत्यांची लाज बाळगा. जिथे तिरंगा फडकवायचा तिथे हातभर शेपटा घालून आपल्या मोहल्ल्यांत तिरंगा यात्रा काढायच्या हे ढोंग आहे. राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे,’ असे म्हणत शिवसेनेने सरकारवर टीकास्त्र सोडलेय. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर टीकेचा बाण सोडला.
काय म्हटलेय अग्रलेखात?
‘आझादीच्या अमृत महोत्सवाचा राजकीय उत्सव संपला असेल तर सरकारने देशाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बरेच काही बोलून गेले. त्यांचे भाषण राजकीय प्रचारकी थाटाचे होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी त्यांनी लाल किल्ल्यावरून केली. पंतप्रधानांचे भाषण संपले आणि इकडे महाराष्ट्रात ‘अग्निवीर’ योजनेची पोलखोल झाली,’ असे शिवसेनेने म्हटलेय.
संभाजीनगरात अग्निवीर भरतीसाठी हजारो बेरोजगार तरुण आले. त्यांना दिवस-रात्र अन्न-पाण्याशिवाय तळमळत रस्त्यावरच राहावे लागले. ‘अग्निवीर’ हे आपल्या देशाचे भाग्यविधाते, राष्ट्रसेवक वगैरे असल्याचे पंतप्रधानांकडून सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात अग्निवीरांची अवस्था भिकाऱ्याहून भिकाऱ्यासारखी केल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळाले. विकसित हिंदुस्थानसाठी हेच पंचप्राण असतील तर कसे व्हायचे? बेरोजगार तरुणांची सैन्यभरतीच्या नावाखाली अशी थट्टा जगाच्या पाठीवर कोठेच झाली नसेल. मुळात बेरोजगारांना गुलाम व लाचार बनविण्यासाठी ‘अग्निवीर’ ही योजना आहे व महाराष्ट्रात याचे बिंग फुटले. अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना कोणी साधे पाणीही विचारले नाही. पण झुंडीच्या झुंडी गोळा करून त्यांना भ्रमित करायचे, धर्माची अफू त्यांच्या डोक्यात कोंबायची व त्याच नशेत ठेवून निवडणुका जिंकायच्या हेच ज्यांचे ‘पंचप्राण’ आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करायची?, असा सवालही शिवसेनेने केलाय.
‘घर घर तिरंगा’ फडकवायची इतकीच देशभक्ती व मर्दानगी होती तर पाकव्याप्त कश्मीरमधील घराघरावर तिरंगा फडकवून आझादीचा अमृत महोत्सव हिमतीने साजरा करायला हवा होता. निदान संपूर्ण कश्मीर खोऱ्यात तरी सध्याचे सरकार ‘घर घर तिरंगा’ फडकवू शकले काय?, तिकडे शेपटी घालणारे इकडे ‘वंदे मातरम्’ आणि ‘घर घर तिरंगा’च्या घोषणा करतात. गलवान व्हॅलीत चिन्यांनी गिळलेल्या जमिनीवर आमचे भाजप पुढारी किंवा केंद्र सरकारातील एखादे हिंमतवाला मंत्री तिरंगा फडकवयाला गेले असते तर त्यांना संपूर्ण देशाने अभिवादन केले असते. पण ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम् म्हणा’, ‘घर घर तिरंगा लावा’ असे फतवे काढायचे व राष्ट्रभक्तीचे बुडबुडे पह्डायचे हाच यांचा आझादी उत्सव. त्यात अमृतापेक्षा राजकीय सूडबुद्धीचेच जहर जास्त आहे, असेही शिवसेनेने नमूद केले आहे.