पिंपरी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज्याचे आणखी एक मंत्री उदय सामंतही गुवाहाटीला पोहोचले. यानंतर आणखी काही आमदार येणार असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून करण्यात आला आहे. यातच आता सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही, असे विधान शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केले आहे. या विधानावरून आता राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
युवासेना नेते आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासाठी सचिन अहिर यांनी विधानसभेची जागा सोडली होती. त्याचवेळी ते शिवसेनेत आले. सचिन अहिरांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत सचिन अहिर यांचा विजय झाला होता. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शिवसेनेतील बड्या नेत्यांनी बंडखोरी केल्याचे समोर आले. शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न केले जात असताना, सचिन अहिरांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही
पुण्यातील चाकणमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना, तेव्हा अहिरांनी फोन नॉट रिचेबल झाला तर काय होऊ शकत, हे सांगताना आपल्याला गुवाहाटीला कोण बोलवत नाही. असे मिश्किल वक्तव्य केले. कमळीच्या नादाला लागून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. विधिमंडळात फ्लोअर टेस्टमध्ये काय व्हायचे ते होईल, पण रोड टेस्टमध्ये काय होतेय ते पहा, तुम्ही मतदारसंघांत तोंड दाखवू शकणार नाही, असा इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिला.
शिवसेना फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे
शिवसेना फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही आम्हाला संपविण्याचा प्रयत्न कराल, त्या त्या वेळी शिवसेना पुन्हा भरारी घेईल. सत्ता तुम्हाला मिळेल, मोठी पदे मिळतील, पण ज्यांनी बंडखोरी केली, तुम्ही संपूर्ण विचार, पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत आहात. जर हिंमत असेल तर प्रथम आमदारकीचा राजीनामा द्या, मग लोकांसमोर जाऊन सांगा, असेही सचिन अहिर म्हणाले.