पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्रिपद गमवावे लागलेले शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राठोड यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा यासाठी बंजारा समाजाकडून २३ एप्रिलला मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचे समजते आहे.
संजय राठोड हे थोड्याच वेळापूर्वी वर्षा बंगल्यावर पोहोचले असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. राठोड हे राज्यभरात समाजाच्या बैठकांमध्ये, सभांमध्ये उघड उघड नाराजी व्यक्त करत होते. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही माझी तर नो बॉल वरच विकेट गेली, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारले होते. चाैकशीतून सत्य बाहेर येण्या अगोदरच आरोपी ठरविले जाते. हा अधिकार विरोधकांना दिला कोणी असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
आता बंजारा समाजाने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राठोड वनवासात गेले होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरु झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. टीव्ही९ ने राठोड वर्षा बंगल्यावर गेल्याचे वृत्त दिले आहे.
बंजारा समाजाला आता मंत्रिमंडळात नेतृत्व मिळते का? पूजा चव्हाण प्रकरणाचे पुढे काय, याबाबत लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.