ED Attaches Shiv Sena MP Sanjay Raut's Assets : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावाने अलिबागमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण ८ प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आले असून, संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅटही ईडीने जप्त केल्याचे सांगितलं जात आहे. १०३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आपण बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवसैनिक असून आजही त्यांचे आपल्याला आशीर्वाद असल्याचं म्हटलं. मी तुमच्या बापालाही घाबरत नाही असंही ते यावेळी म्हणाले.
"तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत आहेत. संपत्ती म्हणताय ती राहते घर असेल किंवा कुणी कष्टाच्या पैशांतून घेली असेल, तर त्याचा संबंध कुठे तरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत," असे राऊत म्हणाले.
राणे बंधूंचीही टीका"संजय राऊत यांना बाहेर ठेवून उपयोग नाही, त्यांना लवकर घोड्यावर बसवून तुरुंगात पाठवा. ज्याअर्थी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे. भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. तो भ्रष्टाचार संजय राऊत नावाच्या व्यक्तीने केला आहे. पैशाचा गैरवापर केला. त्यामुळे त्यांना बाहेर ठेऊन उपयोग नाही. त्यांना लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवलं पाहिजे," अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
"संजय राऊत हे चोर आहेत. संजय राऊत यांनी आता कितीही तडफड केली तरी त्यांची सुटका होणार नाही. राऊतांचा काळा पैसा बाहेर आला आहे. आता त्यांना अटक होणारच. गेल्यावेळीही संजय राऊत यांनी आयकराचे पैसे बुडवले होते, तेव्हा संजय राऊत यांना ५५ लाख रुपये परत द्यावे लागले होते. ते पैसे कशासाठी होते, तेव्हा काय संजय राऊत यांना वारीत पकडलं होतं का?', असा सवाल निलेश राणे यांनी केला.