मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गंभीर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेण्याआधी सोनिया गांधींची परवानगी घेतली आहे का, असा खोचक टोला लगावला होता. यासंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांची जीभ घसरली. किरीट सोमय्यांवर टीका करताना पुन्हा एकदा संजय राऊत यांनी अपशब्द काढले.
देशाच्या राजकारणात बदल घडत आहेत. वर्ष २०२४ नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यामुळे सोमय्यासारखी लोकं राजकारणातून संपतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत असे वक्तव्य करणे हा राज्याचा अपमान आहे. राज्यातील नागरिकांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याला केंद्र सरकार सुरक्षा देते, या शब्दांत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल केला.
बिगर भाजप राजकारणाबाबत विचार
बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. आम्ही सर्वजण तिथे उपस्थित राहणार आहोत. देशाच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, स्टॅलिन किंवा मग उद्धव ठाकरे असो. बिगरभाजपा सरकारे असणारी राज्ये एकत्रित बसून देशातील आगामी राजकारणाबाबत विचार करत आहेत. शरद पवार सर्वात मोठे नेते असून आमचे मार्गदर्शक आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला येत असताना अशाप्रकारे भाजपावाल्यांनी अपमान करणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, मराठी लोकांचा अपमान आहे. म्हणूनच मी त्यांच्याबाबत अपशब्द काढले. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देते हादेखील अपमान आहे, असे सांगत संजय राऊत यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले आहे.