मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लागोपाठ घेतलेल्या सभानंतर राज्यातील राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. भोंगे उतरले नाहीत, तर हनुमान चालिसा लावणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच राज ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही केली आहे. यावरून राज ठाकरेंवर महाविकास आघाडीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला असून, भाजपने सूचवल्यामुळे राज ठाकरे अयोध्येला जात असल्याचे संजय राऊत म्हणालेत.
भारतीय जनता पक्षाने सूचवले असेल म्हणून राज ठाकरे अयोध्येला चालले आहेत. शिवसेना आधीपासून अयोध्येला जात आहे. आमच्या हिंदुत्वाची सुरुवात अयोध्येपासून झाली आहे. आम्हाला निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी आम्ही अयोध्येत जाऊन निवडणूक लढलो. आमचा झेंडा तिथे लावून आलो आहे. राज ठाकरे जातात म्हणून शिवसेना आणि आदित्य ठाकरे अयोध्येला जात नाहीत, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
आम्ही अयोध्येला गेलो होतो तेव्हा आमच्यावर टीका केली होती
मागच्या वेळी आम्ही अयोध्येला गेलो होतो, तेव्हा याच राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली होती. यांना देवही उत्तर भारतातील लागतात, असे म्हटले होते. यावर मीडिया राज ठाकरे यांना प्रश्न विचारत नाहीत. आम्ही त्यांना नाही, तर राज ठाकरे शिवसेनेला फॉलो करत आहेत. ज्या पक्षाला दुसरा पक्ष ऑक्सिजन पुरवतोय, त्यांच्याविषयी जास्त काय बोलणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याउलट राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेली वक्तव्य सर्वश्रुत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ते टीव्ही९च्या मुलाखतीत बोलत होते.
दरम्यान, मशिदींवरील भोंग्याबाबतचा मुद्दा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलो, तरी शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही. भाजपच्या हिंदुत्वाचा प्रकार वेगळा आहे. शिवसेनेचे हिंदुत्व अंतरात्म्यातून आले आहे. यात राजकीय फायदा तोट्याचा प्रश्न नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तो कधीही केला नाही. शिवसेनेने हिंदुत्वासाठी नेहमी त्यागच केला आहे. हिंदुत्वासाठी त्याग करायला शिवसेना सदैव तत्पर आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.