मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. तब्बल दीड तास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. त्यानंतर आता अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अर्थसंकल्पावर टीका करत, मोदी सरकारचे बजेट नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवे असते, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
मोदी सरकारचे बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवे असते. त्यांच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसते. यंदाचे बजेटही तसेच आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. गरिबांचा किती गळा किती आवळतात आणि देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात ते, येत्या काळात पाहू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही
दुसरीकडे, महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडले असून, महागाई वाढल्याने करामध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा मध्यमवर्गीय नोकरदारवर्गाला होती मात्र या अर्थसंकल्पातून तसं दिसलं नाही आणि तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही, अशी टीका मलिकांनी केली आहे.
दरम्यान, भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.