मुंबई: आताच्या घडीला देशातील राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) आणि राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीवरून (Vidhan Parishad Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजप आपले उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपने राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार देऊन चुरस वाढवल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही भाजपने अतिरिक्त उमेदवार दिला आहे. यातच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यात गोंधळ निर्माण करायचा आहे, असा दावा संजय राऊत केला.
राज्यसभेसाठी १० जून रोजी तर विधान परिषदेसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागादेखील लढवणार असल्याचे जाहीर केले. भाजपच्या भूमिकेवर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला.
भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचेय
भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचे आहे. त्यांना राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या सभेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वच मुद्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी भाषणात राजकीय भूमिका स्पष्ट केली. काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अत्याचारावरही भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या सभेवर, भाषणावर विरोधकांनी टीका करावी असे त्यात काय होते, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करावे, असा असेही ते म्हणाले.
दरम्यान, विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी निवडणूक निश्चित समजली जात आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २७ मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह ११३ आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४, शिवसेनेकडे ५६ तर काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत.