Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते. याला साद देत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सामील झाले. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
अलीकडेच पत्राचाळ कथित गैरव्यवहार प्रकरणी जामीन मिळालेले संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवल्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे.
राहुल गांधी अन् आदित्य ठाकरेंमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी गळाभेट घेतली. यानंतर काही अंतर आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत सोबत केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीसाठी दोन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यात चुकीचे काय?, अशी विचारणा करत, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. गजानन आमचे ज्येष्ठ सहकारी होते. आता त्यांनी पक्ष सोडला आहे. ते पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार राहिले. त्यांचे पुत्र मात्र आमच्यासोबत राहिले आहेत. किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा यासाठी होते. ते गेल्यामुळे फार काही नुकसान झालेले नाही. उद्यापासून त्यांना लोक विसरतील, असंही संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"