Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: “अजिबात घाबरु नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी”; राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 11:52 AM2022-03-09T11:52:22+5:302022-03-09T11:55:09+5:30
Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात संजय राऊतांच्या भूमिकेला राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील नेते आणि मंत्र्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या कारवाईवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी ही भाजपची एटीएम असल्याची टीका करत जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहिले असून, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी उभा असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊतांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी नेमके काय म्हणालेत पत्रात?
तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचा मी निषेध करत आहे. तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत, असे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर हे पत्र शेअर केले असून, यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्याला एकत्र लढावे लागेल
संजय राऊत यांनी पत्राबाबत राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील. ईडी अधिकारी खंडणीतून वसूल होणारी रक्कम जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांच्या खात्यांमध्ये जमा करत होते. या खंडणीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वसुली ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईत केली आहे. यासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. ईडी अधिकारी नक्कीच तुरुंगात जातील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.