मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. नवे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पुन्हा एकदा नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टोला लगावत, शिवसेनेचे हायकमांड मुंबईत मातोश्रीवर आहेत, दिल्लीत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. तसेच सीमाभागातून पुन्हा बातम्या यायला सुरुवात झाली आहे, तेथील मराठी लोकांवर परत नव्याने अत्याचार सुरू झालेला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत. केंद्रात आणि कर्नाटकात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे बेळगावसह सीमाभागातील मराठी लोकांवर अत्याचार होत आहे, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, तोपर्यंत तो संपूर्ण भाग केंद्रशासित करावा, अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मांडावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात निर्णय घेऊन महाराष्ट्रात यावे, असे आवाहनही राऊत यांनी केले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री दिल्लीत हायकमांडच्या भेटीला
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, दिल्लीत ते हायकमांडच्या भेटीला गेलेले आहेत. शिवसेनेचे हायकमांड मुंबईतच असतात. कुणी म्हणत असेल, शिवसेनेचे सरकार आहे, तर त्यांनी लक्षात घ्यावे की, शिवसेनेचे हायकमांड मातोश्री आहे, दिल्ली नाही. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीला जात नाही. यापूर्वीही कधी गेले नाहीत. त्यामुळे सगळ्यांचे मुखवटे गळून पडतायत, या शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, बेळगावचे स्थानिक शिष्टमंडळ मला भेटून गेले. तेथील परिस्थिती गंभीर आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेल्यापासून कसा त्रास सुरू झालाय, याबाबत त्यांनी मला सांगितले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याशिवाय, राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आदिवासी आहेत, त्यामुळे अनेक आदिवासी खासदारांना वाटते की त्यांना पाठिंबा द्यावा, असे सांगत शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, या प्रश्नावर संजय राऊत यांनी अधिक बोलणे टाळले.