मुंबई:शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागपूर येथे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर होणाऱ्या कारवाईवरून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांचे विधान चीड, संताप व वेदनेतून आले असून, भाजपला याची किंमत चुकवावी लागेल, अशा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार भाजपविरोधात असलेल्या चिडीतून तयार झाले आहे. आम्ही जो त्रास भोगला आहे, त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहायला मिळाले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवारांचे विधान चीड, संताप व वेदनेतून
शरद पवार जे बोलत आहेत तो त्यांचा संताप, चीड आणि वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवले ते याच चिडीतून निर्माण झालेले आहे. सत्तेसाठी काहीही करायचे, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर करायचा, महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितले आहे की, तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यांवर भन्नाट आरोप केले आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावे लागले. ती व्यक्ती कुठे आहे हे कुणाला माहिती नाही. हे सगळ्यात मोठे विडंबन आहे. जर ते पळून गेले असतील तर त्यात केंद्र सरकारचा हात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
चमचामंडळात सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का?
छगन भुजबळ यांना क्लिनचिट मिळाली. मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घातला त्याचे काय? त्याची भरपाई कोण करणार? पवार कुटुंबीय, मी, अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, प्रताप सरनाईक असे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का? भाजपत किंवा त्यांच्या चमचामंडळात सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का?, अशी विचारणा करत आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचे काहीच पाप नाही. तुम्ही पापी लोकं बुरखे घालून फिरता आणि आमच्यावर आरोप करत चिखलफेक करता, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.