ठाकरे गटाचे नगरसेवक आणि संपर्कप्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सहभागी झाले. नाशिकवर विशेष प्रेम असलेले संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. पुढेही आणखी काय होणार, याबाबत असलेला संशयाचा धुराळा अजूनही बसलेला नाही. अशा वेळी संजय राऊत यांनी नाशिकमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना धीर देणे अपेक्षित असताना सध्या डॅमेज कंट्रोलची जबाबदारी स्थानिक नेत्यांवरच येऊन पडली आहे. ही बाब कार्यकर्त्यांना काहीशी खटकलेली दिसते.
ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी सुरू केलेल्या बैठकांच्या सत्रात बसलेल्या कार्यकर्त्यांची आपसातील कुजबुज याच मुद्दयावर होती. राऊत साहेबांच्या उपस्थितीत बैठकांचा शुभारंभ झाला असता, तर शिवसेनेचा उत्साह टिकून राहिला असता, असे एक जण म्हणत होता. मात्र, दुसऱ्याने साहेब येऊन गेल्यानंतर फाटाफूट झाली. त्यामुळेच ते आले नसतील कशावरून? अशी शंका उपस्थित केली.