मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवना पदाधिकारी, नेत्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, तर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला देत, बंडखोरांना परत येण्यासाठी प्रयत्न करू नका, असे म्हटले आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शिवसेनेतील घडामोडींवर भाष्य केले. वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. ते प्रयत्न उद्धव ठाकरेंनी करू नयेत. मी उद्धव ठाकरेंनाही सांगणार आहे. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू. बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही, असे अनंत गीते यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. इशारा हा शब्द मुद्दाम वापरतोय. फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचे पाप तुम्ही करू नका. हे सांगण्याचे धाडस माझ्याकडे आहे. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोणते पाप करत आहात. शिवसेना ही केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनंत गीते यांनी दिली.
दरम्यान, जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केले, त्यात जनतेचे हित काय आहे? ते कोकणच्या विकासासाठी गेले आहेत का? जनतेच्या प्रश्नासाठी गेले आहेत का? त्यात नुकसानच होणार आहे. पण या सगळ्या नुकसानाला जबाबदार हे बेईमान बंडखोर असणार आहेत, असा इशाराही अनंत गीते यांनी यावेळी बोलताना दिला.