Shiv Sena Shinde Group News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीसह महायुतीचे जागावाटप नेमके कसे होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जागावाटपाबाबत फॉर्म्युलांचे काही दावेही केले जात आहेत. मात्र, अशातच आता महायुतीचे जागावाटप सर्वांच्या मनासारखे होईल असे नाही, असे सूचक विधान शिवसेना शिंदे गटातील नेत्याने केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा ३० जागा लढवणार असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी १८ जागा सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज १८ तास काम करत आहे. त्यांच्यासोबत १३ खासदार ४० आमदार, दहा अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला १३ च्या वरच जागा मिळतील, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याशी बोलले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याशी बोलले आहेत. संभाजीनगरची जागा आमच्याकडे राहील. एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण शिवाय पर्याय नाही. ज्यांना कमळ चिन्हांची आठवण येत असतील त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना विचारून निर्णय घ्यावा आणि काय म्हणतील ते ऐकून घ्यावे. महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र आल्यावर जागा वाटपाबाबत सगळ्यांच्या मनासारखे होईल असे नाही. मात्र तिन्ही पक्ष एकत्र बसल्यावर जागा वाटप होईल आणि एकत्र प्रचार करतील. राज्यात महायुतीला ४० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा सत्तार यांनी केला.
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद आहे. त्यात मी जास्त बोलणे योग्य नाही. संजय राऊत हे स्वतः जेलमध्ये जाऊन आले. त्यामुळे ते दुसऱ्यासाठी तसेच स्वप्न पाहत आहेत, अशी टीका सत्तार यांनी केली. तसेच सामान्यातल्या सामान्य माणसाच्या गरजा लक्षात घेत दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही. याची दक्षता घेण्याचे काम देवेंद्र फडणवीस करीत आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. अजित पवार यांनीही वित्तमंत्री झाल्यापासून मदत केली, असे सत्तार म्हणाले.