अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला का गैरहजर राहिले? भरत गोगावलेंनी सगळे सांगितले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:56 IST2025-02-11T16:52:49+5:302025-02-11T16:56:34+5:30
Shiv Sena Shinde Group Bharat Gogawale News: अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला माहिती देण्यात आली नव्हती, यावरून नव्या वादाची ठिणगी पडल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला का गैरहजर राहिले? भरत गोगावलेंनी सगळे सांगितले, म्हणाले...
Shiv Sena Shinde Group Bharat Gogawale News: एकीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात शीतयुद्ध सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या एकही आमदाराला माहिती देण्यात आली नव्हती, यावरून नव्या वादाची ठिणगी पडल्याचे सांगितले जात आहे. अजित पवारांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मंत्री अदिती तटकरेचे उपस्थित होत्या. यावरून शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी बोलावून दाखवली. यानंतर आता भरत गोगावले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आले होते. परंतु, यावरून शिवसेना शिंदे गटाचे इच्छूक भरत गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोगावले समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत दबावतंत्राचा वापर केला. यामुळे तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा लागला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, दोन्ही गटात तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अशातच जिल्हा नियोजन बैठकीबाबतचा प्रकार घडला. यावरून आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला का गैरहजर राहिले?
मी मिटिंगला नव्हतो. कारण रायगडावर भिडे गुरुजींचे धारकरी आले होते. माझ्याच मतदारसंघात उंबरटपासून रायगडपर्यंत धारकरींची पाच दिवस पायी यात्रा होती. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यामुळे बैठकीला येणार नाही हे मी आधीच सांगितले होते. माझ्या मतदारसंघात धारकरी येणार असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही रायगडला येण्याचे निमंत्रण दिले होते. ते आले नाहीत. काही कारणाने अजितदादांनी कालची मिटिंग आज बोलावली, असे गोगावले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रायगडावर ४० ते ५० हजार धारकरी आले होते. त्यांना सामोरे जाणे माझं कर्तव्य होते. म्हणून मी बैठकीला गेलो नाही. पण मी त्याबाबत कळवले होते. शिवसेनेचे इतर आमदार बैठकीला का नव्हते याची मला कल्पना नाही, असेही ते म्हणाले.