Shiv Sena Shinde Group Bhavana Gawali News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आले. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महाराष्ट्रात शिंदे गटाला ०७ जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटात उमेदवारीवरून मानापमान नाट्य रंगले होते. काही ठिकाणचे उमेदवार बदलण्यात आले. यातच मला उमेदवारी मिळू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता, असा दावा भावना गवळी यांनी केला आहे.
वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी या तीन टर्मपासून निवडून आल्या. मात्र, यावेळी भावना गवळी यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. भावना गवळी म्हणाल्या की, मागील २५ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते. सर्वसामान्य नागरिकांशी माझी नाळ जोडली गेली आहे. सर्वांसोबत माझे जे काही चांगले संबंध राहिले आहेत त्याचा मला वैयक्तिक निश्चितच फायदा होणार आहे. जेव्हा जेव्हा निवडणुकीला उभी राहिली आहे, तेव्हा जास्त मते घेतली आहेत. मला असे वाटते की, ही उमेदवारी सहाव्या वेळी मला दिली असती तर प्रचंड मतांनी विजयी झाले असते, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.
मला तिकीट नाकारण्यासाठी एकनाथ शिंदेंवर दबाव
जे काही झाले, जे काही घडले, वेळेवर काही विषय मांडले गेले नाहीत. एकंदरीत महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली तीच इथे आहे. एकनाथ शिंदे आणि पक्षावर दबाव होता. उमेदवारी देऊ नका, त्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली. मात्र, अशा प्रकारच्या स्क्रिप्ट पक्षाच्या हिताच्या नसतात, असे भावना गवळी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच संपूर्ण वाशिम आणि यवतमाळची जनता अनेक वर्षांपासून खासदार म्हणून पाहत आहे. इथे काम केले आहे. शिवसेना पक्षाची सक्षमपणे धुरा संभाळत आले आहे. यावेळी जे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले, त्याचाच हा एक भाग आहे. जनतेची जी इच्छा होती, ती इच्छा कदाचित पक्षाच्या वरिष्ठांकडून पूर्ण झाली नाही. जनतेने हे मतांच्या रूपाने दखवले आहे, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कधी कधी सत्य हे कटू असते, पण ते बोलले पाहिजे. मला असे वाटते की, ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मी होते. त्यांनी मागील अनेक वर्षांपासून माझ्यावर विश्वास दाखवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव होता, असे म्हणायला आता काही हरकत नाही. हेमंत पाटील यांनीही मान्य केले होते की, ही स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे. हे तर सत्यच आहे की, पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात विरोधात असणाऱ्या उमेदवाराला लीड आहे. बाकीच्या ही मतदारसंघात लीड आहे. या ठिकाणी निश्चित चिंतन झाले पाहिजे कारण पुढची विधानसभेची निवडणूक आपल्याला लढायची आहे. जी काही स्क्रिप्ट लिहीली गेली होती त्या स्क्रिप्ट लिहिणाऱ्यावर जबाबदारी टाकली यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करावा, असा सल्ला भावना गवळी यांनी दिला आहे.