Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकावर टीका करत कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले. याला आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ज्या मुलीवर कोयत्याचे वार झालेत. तिची आई माझ्याशी बोलली. मुलीला न्याय मिळाला नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी ती सरकारकडे करत आहे. पारधी समाजातील ही मुलगी आहे. बार्शीतल्या गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृण हल्ला केला. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय योग्य माध्यमातून पोहोचवला. त्या मुलीवर झालेल्या इतर अत्याचाराविषयी कोणताही उच्चार केला नाही, त्यात माझे काय चुकले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली. यानंतर दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर पलटवार केला.
संजय राऊतांची दखल कुणीही घेत नाही, राज्यात कोणीही किंमत देत नाही
संजय राऊतांचे बोलणे हे नेहमीच खालच्या पातळीवरचे असते. हल्ली कोणीही संजय राऊतांची दखल घेत नाही. आज त्यांना राज्यात कोणीही किंमत देत नाही, असा खोचक टोला दीपक केसरकर यांनी लगावला. तसेच संजय राऊतांनी आमदार कुल आणि दादा भुसेंवर केलेल्या आरोपांवर बोलताना, भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणे हा एक भाग असतो. त्यात काही तथ्य असणे ही वेगळी गोष्ट असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपावर संबंधित नेते उत्तर देतील. फक्त राजकारण म्हणून कोणाला तरी बदनाम करण्याच प्रयत्न होऊ नये. कारण महाराष्ट्राचे राजकारण नेहमी जनतेच्या हिताचे राहिले आहे. पण आज ते व्यक्तिगत पातळीवर उतरत आहे, यापेक्षा दुर्देवी गोष्ट नाही, या शब्दांत दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना सुनावले.
दरम्यान, जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल, तर राज्यातला कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय, हे स्पष्ट दिसेल. आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन कली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हिडीओवरून एसआयटी स्थापन केली जाते. एका मुलीचा फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केले म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो, असे सांगत संजय राऊतांनी घणाघाती टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"