Ravi Rana Vs Shiv Sena Shinde Group: पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली. या योजनेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या याजनेवरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर आरोप केले आहेत. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी या योजनेबाबत केलेल्या विधानावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून महायुतीवर टीकास्त्र सोडले. यावरून आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी रवी राणा यांना समज दिली आहे.
आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजेच ३००० करु, तर आता यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून १५०० रुपये वापस घेणार, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले. यावरून गदारोळ झाल्यानंतर रवी राणा यांनी घुमजाव केले. आपण गमतीने हे वक्तव्य केले. कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. शिंदे सरकारकडून महिलांच्या खात्यावर पहिल्यांदा पैसे टाकण्यात येणार आहे, असे रवी राणा म्हणाले.
चुकूनही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे काढण्यावर बोलू नका
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांनी केलेल्या विधानावरून समज दिली आहे. रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. सरकारने आणलेली योजना आहे. विनोदात म्हटले असतील तरी ते चुकीचेच आहे. विनोदातही लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेण्याचे वक्तव्य करु नका, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बहीण भावाचे नाते आपुलकीचे असले पाहिजे. जे गमतीने बोललो त्याचा विरोधक बाऊ करत आहे. लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही वाईट वाटेल असे वक्तव्य केले नव्हते. भाऊ हा बहिणीचे कुठेही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. काँग्रेसने खोटे बोलून मतदान घेतले, पण हे सरकार तसे करणार नाही, अशी सारवासारव रवी राणा यांनी केली.