Maharashtra Politics: रिझर्व्ह बँकेने २ हजारांची नोट चलनातून मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. देशवासीयांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांची नोट बँकेत जमा करणे किंवा बदलून घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यानंतर आता विरोधकांकडून या निर्णयावर टीका केली जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून शिवसेना शिंदे गटावर टीका केली. या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, संजय राऊतांवर बोचरी टीका करण्यात आली आहे.
५० खोके ज्यांना दिले त्यांच्याकडेच २ हजारांच्या नोटा आहेत. यामुळे ४० आमदार हैराण झाले असून फार मोठी धावपळ चाललीय. ब्लॅकचा पैसा हा सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारकडे आणि भाजपाकडे आहे. सामान्य माणसाकडे २००० च्या नोटा नाहीत. पहिली आणि दुसरीही नोटबंदी फसली. पंतप्रधान देशाशी खोटे बोलले. नोटबंदीच्या निर्णयामुळे साडेतीन ते चार हजार लोक बँकेच्या रांगांमध्ये मरण पावले. हा सदोष मनुष्यवध आहे. याचे प्रायश्चित घेणार आहात का? असा सवाल संजय राऊतांनी केला. यावर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पलटवार केला आहे.
माठ आहेत म्हणून त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही
नोटबंदी जर फसली असती तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली नसती. भारताच्या अर्थव्यवस्थेने १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. याचे सगळ श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे सांगत, शंभर कौरवांचा जन्म शंभर माठात झाला होता , एकशे एकव्या माठातून संजय राऊतांता जन्म झाला आहे. माठ आहेत म्हणून त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका ज्योती वाघमारे यांनी केली. तसेच २००० हजारांच्या नोटा बंद झाल्या तर त्याची भीती त्यांनाच वाटायला पाहिजे ज्यांच्याकडे नोटा आहेत. संजय राऊत शिवसेना संपवण्यासाठी जो तुमचा पगार आहे , तो सिल्व्हर ओकच्या काकांकडून दोन दोन हजारांच्या नोटांमधून तुमच्या कडे येत आहे का?, असा सवाल ज्योती वाघमारे यांनी केला आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या घरी कपाटाच्या कपाट भरून कदाचित दोन हजारांच्या नोटांनी भरलेली असतील, त्यामुळे त्यांना या नोटबंदीची भीती वाटत आहे, असा दावा करत संजय राऊतांसारख्या किडुक-मिडुकाने PM मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, या शब्दांत ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.