Shiv Sena Shinde Group News: निष्ठावान शिवसैनिकांना डावलून ठाकरे गटाकडून आयारामांना संधी दिली जात आहे. ठाकरे गटाने आयात उमेदवारांना खासदारीचे तिकिट देऊन निष्ठावान शिवसैनिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. उद्धव ठाकरे यांचा धूर्त चेहरा आता उघड झाला आहे. ठाकरे गटात उरले सुरलेले कार्यकर्तेही जय महाराष्ट्र करतील, या शब्दांत शिंदे गटातील नेत्याने ठाकरे गटावर निशाणा साधला.
ठाकरे गटाने कल्याण डोंबिवली, पालघर, जळगाव आणि हातकणंगले येथून चार उमेदवारांची यादी जाहीर केली. यापूर्वीही ठाकरे गटाने काही उमेदवार घोषित केले होते. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी उमेदवारांची नावे घेत ते कोणत्या पक्षातून आले होते आणि त्यांना कशी उमेदवारी दिली, याबाबत भाष्य करत टीकास्त्र सोडले.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी
ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजय दिना पाटील मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस ईशान्य मुंबईचे खासदार होते. शिवसेनतून २०१४ मध्ये कॉंग्रेस आणि नंतर भाजपात गेलेल्या भाऊसाहेब वाघचौरे यांची पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी भाजपाने हकालपट्टी केली होती. त्याच वाघचौरे यांना पुन्हा ठाकरे गटाने उमेदवारी दिली. सांगलीत ठाकरे गटाने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, असे किरण पावसकर म्हणाले.
मनसेमधून ठाकरे गटात आलेल्यांना उमेदवारी दिली
वाशिममधील ठाकरे गटाचे उमेदवार हे आयात उमेदवार आहेत. अपक्ष आमदार संजय देशमुख यांनी काहीच दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना डिसेंबर महिन्यात ठाकरे गटाने पक्षात घेतले होते. अवघ्या तीन महिन्यात संजोग वाघेरे यांना ठाकरे गटाने मावळची उमेदवारी दिली. तसेच कल्याण मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांनी मनसेतून २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. जळगावमधील भाजपा नेते उन्मेष पाटील, करण पवार यांना ठाकरे गटाने पक्ष प्रवेश दिला. करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली आहे. मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले करण पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, असे सांगत उमेदवारीमध्ये आयारामांना कशी संधी दिली, याचा पाढाच किरण पावसकर यांनी वाचून दाखवला.
दरम्यान, निवडणुकीच्या उमेदवारी वाटपात उद्धव ठाकरे कोणत्या थराला जातात, हे यातून दिसून आले. त्यामुळे आता उरले सुरलेले कार्यकर्तेही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करतील, अशी टीका पावसकर यांनी केली.