Maharashtra Politics: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यानंतर यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली असून, भाजप आणि शिंदे गटाने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. शिंदे गटाकडून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार, असा टोला शिंदे गटाकडून लगावण्यात आला.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर युवकांबरोबरच शेती, कामगार, नोकरदार आणि शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टींची तरतूद केली गेली आहे. त्याचा फायदा देशातील अनेक बेरोजगार युवकांसाठी होणार आहे. ज्या प्रकारे देशातील युवकांसाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर ठरणार आहे, त्याचप्रमाणे त्याचा फायदा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीसुद्धा फायदेशीर ठरणार आहे, असे दीपक केसरकर यांनी नमूद केले.
स्पेशल पॅकेज देऊन तरुणांना स्वयंभू रोजगार करता येणार
शिक्षणावर तरतूद जास्त होती ती आणखी वाढवण्यात आली आहे. तर एकलव्य शाळा असतात त्यामध्ये एकच शिक्षक असतो तो दुर्गम भागात जाऊन शिकवतो त्याची नोंदही आजच्या अर्थसंकल्पमध्ये घेण्यात आली आहे. त्याच बरोबर वाढत्या बेरोजगारीसाठी स्पेशल पॅकेज देऊन तरुणांना स्वयंभू रोजगार करता येणार आहे. ज्या प्रमाणे देशातील नागरिकांना सर्व देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच ग्रंथालयसारखी मोठी चळवळही सुरु केली जाणार आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अल्पसंख्याक समाजाला काहीच मिळाले नाही. तर मुंबई, महाराष्ट्रालाही अर्थसंकल्पातून काही मिळाले नाही, असे सांगत विरोधकांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना, ज्यांना फक्त राजकारण दिसते त्यांना काय बोलणार, अशी विचारणा दीपक केसरकर यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"